आषाढ
शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला आपण व्यास
पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. ज्यांनी महाभारत लिहिले अशा व्यास ऋषींना वंदन
करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा शुभदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरु अद्याप
झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना, गुरूंना वंदन करावे असे आपले शास्त्र सांगते. महर्षि व्यास हे भारतीय
संस्कृतीचे आणि शास्त्राचे मूलाधार मानले जातात. आपल्या देशात महाभारत काळापासून
गुरु-शिष्य परंपरा चालत आलेली आहे. अशा या गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता
व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती
आजपर्यंत चालू आहे. आपण कोणाचे तरी शिष्य आहोत या भावनेत एक कृतज्ञता वाटते.
भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. शुक्राचार्य- जनक,
कृष्ण,सुदामा- सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम
- कर्ण, अर्जुन - द्रोणाचार्य. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा
पाहिली की सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूची प्रार्थना करायची. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे परंतु घटाने, घागरीने पाणी खाली वाकल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा .....